नागभीड : येथील एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून २८ आॅगस्ट २०१४ रोजी केलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनिस भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भरती प्रक्रियेत सर्व नियुक्त उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. उद्या २५ नोव्हेंबरला जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वत:ही कागदपत्राची चौकशी करणार असल्याचे एकच खळबळ उडाली आहे. नागभीड तालुक्यात रिक्त झालेल्या जागांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करून अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत एकूण २४ महिलांची नियुक्ती करण्यात आली. यात १४ मदतनिस, ९ अंगणवाडी सेविका आणि एक मिनी अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे. २८ आॅगस्टला निवड यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर यादीवर आक्षेप घेण्यात आल्याने ४ सप्टेंबरला पुन्हा सर्वच अर्जदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक तक्रारी झाल्या. या तक्रारीची दखल जि.प. प्रशासनाने घेतली असून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबरच्या एका पत्राद्वारे चौकशी करणार असल्याचे एकात्मिक महिला व बालविकास कार्यालयाला कळविले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या सुचनेनुसार बालविकास कार्यालयाने निवड झालेल्या २४ महिलांना २५ नोव्हेंबर मंगळवारला मुळ कागदपत्रासह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. उप मुख्यकार्यकारी अधिकारी स्वत: भरती प्रक्रियेची चौकशी करणार असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त उमेदवारांच्या कागदपत्रांची चौकशी
By admin | Updated: November 24, 2014 22:54 IST