चंद्रपूर : मध्य प्रदेशातून आणलेल्या मदिरा नामक कंपनीच्या देशी दारूच्या १५१ पेट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावली पोलीस स्टेशन हद्दीतील व्याहाड बु. येथे शुक्रवारी जप्त केल्या. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. महेश रवींद्र गड्डमवार (२४, रा. व्याहाड बु.) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेची आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे. लॉकडाऊन असतानाही सावली पोलीस स्टेशन हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जाऊन कारवाई करतात. त्यामुळे सावली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात दारूविक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना सावली तालुक्यातील व्याहाड बु. येथे दारूसाठा असल्याच्या माहितीवरून सहकारी सोसायटी व्याहाड बु.च्या समोरील महेश गड्डमवार याच्या घरासमोरील उभ्या असलेल्या अल्टो कार एमएच ३४ ए ११२९७ व पीक अप क्रमांक एमएच ३३ जी १९९० या दोन्ही वाहनांतून देशी दारूच्या १५१ पेट्या असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी महेश गड्डमवारला विचारणा केली असता गडचिरोली येथील मयूरने दारू आणून दिली असल्याची माहिती दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन गद्दे, अविनाश दशमवार, अमजद खान, रवींद्र पंधरे, अपर्णा मानकर यांनी केली.