नांदाफाटा : अलिकडे इंग्रजी शिक्षणाची सगळीकडेच क्रेज निर्माण झाली आहे. चांगल्या शाळेत इंग्रजी शिक्षण घेता यावे, यासाठी पालकांची रांग लागलेली दिसते. मात्र काही इंग्रजी शाळा शिक्षणाच्या नावावर पालकांकडून अव्याच्यासव्वा शुल्क आकारत आहेत. अल्ट्राटेक येथील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल या इंग्रजी शाळेत यावर्षी पहिली ते आठवीसाठी २७५० रुपये, नऊवी ते १२ वीसाठी ३००० रुपये प्रति महिना शुल्क ठेवण्यात आले आहे. अचानक झालेल्या शुल्कवाढीमुळे मुलांना इंग्रजी शिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला आहे. पालकांना विश्वासात न घेताच शैक्षणिक शुल्क वाढविल्याचा आरोप पालक करीत आहे. गेल्या वर्षीही अशीच शुल्कवाढ करण्यात आली होती. प्रति महिना १६२५ रुपये घेण्यात आले. त्यावेळी ३१ जुलै २०१४ ला स्थानिक आमदार, कंपनी व्यवस्थापन, दत्तक गावातील सरपंच यांच्याकडे पालकांनी न्याय मागितला. मात्र शुल्कामधील वाढ जैसे थेच होती. आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाने अधिक शुल्क वाढविल्याने पालक त्रस्त आहेत. या शुल्काव्यतिरिक्त पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य स्वत:च पालकांना खरेदी करून द्यायचे आहे. विशेष म्हणजे, नविन सत्राचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. अल्ट्राटेक कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शाळेचे शुल्क अत्यंत कमी आहे. यातच बाहेर गावातील कंत्राटी कामगार, मजूर, शेतकरी यांच्या पाल्यांसाठी अधिकचे शुल्क भरावे लागत आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या पालकांना कुटुंबाचा बोझा वाहताना आता शिक्षणाची चिंता भेडसावत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अनेक बाहेरील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अचानक फी वाढ झाल्याने शिक्षण घेणे कठीण होत आहे. त्याचबरोबर काही पालकांचे दोन- दोन अपत्य या इंग्रजी शाळेत शिकतात. अशा पालकांना दर महिन्यात पाच ते सहा हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरावे लागत आहे. दुसरीकडे अनेक कामगारांचे महिन्याचे वेतन पाच ते सहा हजार रुपये आहे. सिमेंंट कंपनीने लगतचे नांदा, बिबी, आवारपूर, नोकारी, पालगाव, बाखर्डी हे गाव दत्तक म्हणून घेतले आहे. या गावातील पाणी, आरोग्य, रस्ते आणि शिक्षणावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत असल्याचे दिसत आहे. तसा अहवालही शासनाकडे पाठविला जात आहे. परंतु कंपनी प्रशासन दत्तक गावातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश देऊन आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार आता पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे. शाळेने वाढविलेले शैक्षणिक शुल्क त्वरित कमी करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शशिकांत दिवे यासह अनेक पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)
पालकांना विश्वासात न घेता शाळेकडून शुल्कवाढ
By admin | Updated: April 26, 2015 01:46 IST