हंसराज अहीर : हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त चंद्रपूर : ग्रामीणांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक लोकहितैषी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये ग्रामीण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास व्यक्त करतानाच ग्रामीण भागामध्ये हळदी प्रकल्पाच्या उभारणीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व त्यांना या पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. स्पार्क्स ट्रेडर्सद्वारा नवीन वस्ती डोंगरगाव (खांबाडा) येथे उभारण्यात आलेल्या हळदी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय ना. अहीर बोलत होते. या कार्यक्रमास भाजपा वरोराचे तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपा जिल्हा वर्धाचे सरचिटणीस किशोर दिघे, स्पार्क्स ट्रेडर्सचे अध्यक्ष प्रशांत झाडे, भाजप नेते अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ, अजय चव्हाण, गजानन झाडे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, तालुका खरेदी विक्री समुद्रपूरचे उपाध्यक्ष अरविंद झाडे, वामन झाडे आदींची उपस्थिती होती. ना. अहीर म्हणाले की, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा व्यस्त असलेला वेळ व पैशाची बचत होईल या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रेरणा घेत अनेकांना प्रकल्प सुरू करण्यास स्फूर्ती मिळेल. जलयुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री सिंचन योजनांच्या माध्यमातून खेड्यांचा विकास व आयातीऐवजी निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, अशा प्रकारचे कृषी उत्पादन देशामध्येच तयार करून कृषीप्रधान देशाची संकल्पना अबाधीत ठेवण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक स्पार्क्स ट्रेडर्सचे अध्यक्ष प्रशांत झाडे यांनी केले. (प्रतिनिधी)
हळद प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:57 IST