चंद्रपूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा ग्रंथालय अधिकारी व ग्रंथोत्सव आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात आज चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यात शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार व लेखक शैलेश पांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, वाचन विकास प्रकल्पाचे संयोजक डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस. जे. कोरे, ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास, ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य उध्दव डांगे व सुचित कुलकर्णी उपस्थित होते.जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात. या सर्व क्रांतीमध्ये अक्षरांनी घडविलेली वैचारिक क्रांती सर्वश्रेष्ठ आहे. माणसाला विचारशील करण्याची ताकद फक्त ग्रंथातच आहे, असे प्रतिपादन शैलेश पांडे यांनी केले. उत्तम लेखक होण्यासाठी आधी उत्तम वाचक व्हावं लागतं. त्यानंतरच अनुभव संपन्न ग्रंथाची निर्मिती होऊ शकते, असेही ते म्हणाले. ग्रामीण भागात वाचन संस्कृती बळकट करण्याची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक शाळा तेथे ग्रंथालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केल्या जातील, असे संध्या गुरुनुले यांनी सांगितले. ग्रंथ माणसांना घडवित असतात. ग्रंथानेच माणसाच्या आयुष्यात प्रगती होत असते. माणसाचे व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यात ग्रंथाचा मोलाचा वाटा असतो. ग्रंथ आत्म्याची शुध्दी करणारे साधन असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांमध्ये वाचन चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला, जाईल असे वचन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे संचालन कल्पना बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक रवी गिते यांनी तर आभार शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी मानले. ग्रंथोत्सवात २६ स्टॉल लागले असून प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात सर्वांसाठी खुले राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
By admin | Updated: February 9, 2015 23:09 IST