वनविभागाचे दुर्लक्ष : अनेक वृक्ष नामशेषमूल : वनपरिक्षेत्र बफरझोनची निर्मिती करुन ९ हजार ६७०.५९ हेक्टर आर क्षेत्र असलेल्या जागेत वनसंपदा व वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. मूल वनपरिक्षेत्रातील डोनी व फुलेझरी ही गावे जंगलव्याप्त परिसरात असल्याने या क्षेत्रात वनपाल व वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा घेत डोनी व फुलेझरी गावातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. मूल बफरझोन परिक्षेत्र हे ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट असून डोनी व फुलझरी हे गाव जंगलव्याप्त परिसरात आहेत. या गावातील जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, सांबर, चितळ, रानडुक्कर, मोर, ससे, रानकोंबडे आदी मोठ्या प्रमाणात आढळतात. यातच सोन्यापेक्षा महाग समजल्या जाणाऱ्या सागवन व बिजा या वृक्षासोबतच येन, धावळा, कळब, भेरा, सिसम, शिवन, गराडी, मोहा, तेंदू आदीची वृक्षदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. साग व बिया या लाकडाची मागणी चांगली असून सर्वात महागडे असल्याने व या जंगलात सागवन मोठ्या प्रमाणात असल्याने तस्कराची नजर याकडे आहे.त्यामुळे वनरक्षक व वनपालाची नजर चुकवीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तैनात असलेल्या वनरक्षक व वनपाल मुख्यालयी राहण्याची तसदी घेत नसल्याने वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम वृक्षतोडीवर होताना दिसत आहे. डोनी, फुलझरी या गावासोबतच करवन, काटवन, मारोडा, पडझरी, रत्नापूर ही गावेसुद्धा जंगलव्याप्त आहेत. या गावाकडेही वनरक्षकाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यासाठी असलेला निवारा नष्ट होत आहे.
बफरझोन वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड
By admin | Updated: September 17, 2015 01:02 IST