लोकमत न्यूज नेटवर्क दुर्गापूर : भद्रावती येथील डॉली पेट्रोलीयमच्या एका टँकरमधून मोहर्लीतील जिप्सीधारकांना अवैधरित्या पेट्रोल विक्री करीत असताना आज बुधवारी सकाळी दुर्गापूर पोलीसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. सचिन तिडके, मोहम्मद आमीर मोहम्मद आदील शेख दोघेही रा. भद्रावती अशी आरोपींची नावे आहेत. भद्रावती येथे डॉली पेट्रोलीयम नामक पेट्रोल पम्प आहे. पेट्रोल पम्प मालकाकडे एम.एच.३४ ए.व्ही ७८६० क्रमाकाची एक छोटी पेट्रोल टँकर आहे. या टँकरद्वारे इतरत्र जाऊन किरकोळ पेट्रोल विकण्याची परवानगी नाही. मात्र या टँक्टरमध्ये पेट्रोल भरून मोहर्लीतील जिप्सीधारकांना अवैधपणे पेट्रोल विकले जात असल्याचे आजच्या घटनेवरून उघडकीस आले. रविवारी मोहर्ली गेटजवळ उभ्या असलेल्या जिप्सीधारकांना याच टँकरमधून ९६० लिटर पेट्रोल विकल्याची माहिती दुर्गापूर पोलीसांना मिळाली. त्यामुळे दुर्गापूर पोलिसांनी यावर पाळत ठेवली होती. बुधवारी परत हाच टॅकर पेट्रोल विकण्याकरिता मोहर्ली गेटजवळ आला. जिप्सीधारकाच्या जिप्सीमध्ये पेट्रोल भरत असताना पोलीसांनी दोघांना रंगेहात पकडले.
टँकरमधून पेट्रोलची अवैध विक्री
By admin | Updated: June 1, 2017 01:27 IST