सुधीर मुनगंटीवार : वन वसतिगृह व विश्रामगृहाचे लोकार्पण चंद्रपूर : एकविसाव्या शतकात सर्वात महत्त्वाचे कोणते दान असेल तर ते रक्तदान व आक्सिजन दान आहे. मनुष्य रक्तदान करू शकतो. आक्सिजन दान करायचे असेल तर वृक्ष लावले पाहिजे. वृक्ष संपदेतूनच धन संपदा येऊ शकते, त्यामुळे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मिशन म्हणून हाती घेतला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रामबाग येथे वन विभागाच्या वन वसतिगृह व वन विश्रामगृहाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक आर.टी.धाबेकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाच्या नया विश्रामगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह व त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सदर इमारत उभी राहत आहे. या विश्रामगृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या सोई व त्यांच्या मुलांना सुध्दा चांगली सुविधा मिळेल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन, कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता, गणवेश भत्ता समस्या सोडविण्यासोबतच चांगल्या दर्जाची निवासस्थाने बांधून देण्याचे नियोजन केले जात आहे. वनांच्या संवर्धनात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गेल्यावर्षी आपण २ कोटी ८३ लाख वृक्षांची लागवड केली. यावर्षी तीन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. त्यासाठी अत्याधुनिक नर्सरीही तयार केली जात असल्याचे, ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. सुरूवातीस वन वसतिगृह व वन विश्रामगृहाच्या नामफलकाचे अनावरण तसेच फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्मित इमारतीची पाहणीही केली. (स्थानिक प्रतिनिधी) चिचपल्ली येथे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशातील सर्वात सुंदर प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. नाशिक येथे देशातील पहिले वन विभागाचे काल सेंटरचे लवकरच उद्घाटन होणार आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील प्रत्येक कुटूंबास गॅसचे वितरण केले जात आहे. वन विभागाच्या या सर्व कार्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. वनविद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न गोंडवाना विद्यापीठाचा एकात्मिक आराखडा आपण करतो आहे. देशातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात असून त्यासाठी चंद्रपूर चांगले ठिकाण आहे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मोहफुले मोठ्या प्रमाणावर आहे. या फुलांपासून दोनशे कोटी रूपयांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. मोहफुले हे सेफ या फळापेक्षाही नऊ पट अधिक पोषक आहे. त्यामुळे या फुलांकडे महसूल व जीवनसत्वाच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वन संपन्न असेल तर धन संपदा येईल
By admin | Updated: December 26, 2016 01:17 IST