हंसराज अहीर: महापालिकेत सत्कार व गुणगौरव सोहळाचंद्रपूर: देशाची सर्वप्रथम सुत्रे स्वीकारलयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत हा नारा देत संपूर्ण देशभरात स्वच्छतेविषयी क्रांती घडविली आहे. आज संपूर्ण देशात लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जी जागरूकता व त्या दिशेने सामूहिक प्रयत्न होताना आपण बघतो, त्याला पंतप्रधानांची तळमळ आणि धडपड कारणीभूत आहे. २६ मे रोजी केंद्र सरकारने व्यक्तींचा सत्कार व चंद्रपूर शहर महानगरपालिकेला स्वच्छतेबाबत प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल गुणगौरव करण्याची संधी लाभल्याने विशेष आनंद व आत्मिय समाधान वाटते, पुरस्कृत झालेल्या महापालिकेचाही सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार, गयाचरण त्रिवेदी, विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजप मनपा गटनेते वसंत देशमुख, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लहामगे, राजेश मून, मनपा उपायुक्त देवळीकर उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी केंद्र सरकारच्या विकासाभिमुख अशा तीन वर्षाच्या सफ ल कारकीर्दीचा परामर्श घेत पंतप्रधानांच्या अविश्रांत परिश्रमातून देश घडतो आहे व देशाचे आमुलाग्र अशा विकासात परिवर्तन होत आहे. राष्ट्र हेच सर्वस्व मानून प्रधानमंत्री १८ तास या देशाच्या सेवेत घालवत असल्याने आम्हा सर्वांच्या जबाबदारीत भर पडली आहे. देशाचे नागरिक म्हणून राष्ट्रहिताशी अभिप्रेत असे कार्य आपल्या हातून घडविण्यासाठी आम्हास सिध्द व्हावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्हास देश व लोकसेवेची संधी देणारेच खऱ्या अर्थाने ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत. सेवकाचे काम आम्हासारख्या लोकप्रतिनिधींचे आहे, ही खुनगाठ मनाशी बांधून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याला न्याय दिल्यास देशात क्रांती घडेल. गेल्या तीन वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या मंत्र्यांवर कोणतेही आरोप झाले नाही. याकडे लक्ष वेधत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा अर्थ केवळ स्वच्छतेशी निगडीत नसून ते स्वच्छ व पारदर्शी अशा जीवन पध्दतीलाही आहे, असे सांगितले. आज चंद्रपूर महानगरपालिकेत ज्यांच्या अविश्रांत परिश्रमाने या महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार लाभला, त्या सर्वांप्रति ऋण व्यक्त करणे हे कर्तव्य समजून आज या गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कार केला जात आहे. या सत्कारातून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.यावेळी आ. नाना श्यामकुळे यांनी भाजप लोकप्रतिनिधींनी विकासाच्या वाटा प्रशस्त केल्या असल्याचे सांगत वरोरा नाका पूल, महिला रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाबुपेठ उड्डाणपूल, इरई खोलीकरण, अमृत योजना व नगरविकासाच्या विविध योजना भाजप लोकप्रतिनिधीच्या परिश्रमाचे फ लित आहे. भाजप नेतृत्वातील सरकारने विकासाचे स्वप्न घेवून सत्ता सांभाळली आहे व विकासातून शब्द पाळलेला आहे, असे सांगितले.महापोरांनी आपल्या कार्यकाळातील भावी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.याप्रसंगी ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांनी माजी महापौर राखी कंचर्लावार यांचा स्वच्छतेच्या राज्य पुरस्काराबद्दल शाल, श्रीफ ळ व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला. यावेळी उपमहापौर अनिल फु लझेले. राहुल पावडे, देवानंद वाढई, आशा आबोजवार, उपायुक्त देवळीकर, रवी हजारे, गर्गेलवार, रूपेश गोटे, चिंचोळकर, गजानन धकाते, संजय हजारे, कुसूम मेश्राम, सुमन मेश्राम, तारांचद चालखुरे, जया भोयर, धनंजय समर्थ, शंभूनाथ सिंह, उदय मैलारपवार, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे, विजय पोतनूरवार यांचाही ना. अहीर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.
स्वच्छतेबाबत पुरस्कृत महापालिकेचा सार्थ अभिमान
By admin | Updated: May 29, 2017 00:29 IST