फोटो- घटनेची पाहणी करताना गटनेते विलास विखार
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरातील पेठवॉर्ड परिसरात असलेल्या तलावात शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील तीन तलावांपैकी पेठवॉर्ड परिसरात असलेल्या तलावात रविवारपासून पाण्यातील जिवंत मासे अचानक मृत्यू पावले आहेत. तलावातील पाण्यावर मेलेले मासे तरंगताना दिसल्याने परिसरातील नागरिकांनी मासे पाहण्यासाठी गर्दी केली. या तलावाच्या भरोशावर अनेक वर्षांपासून मासेमारी करणारे अनेक मच्छीमार व्यावसायिकांची उपजीविका चालत आहे. अचानक मृत्यू पावलेल्या मासोळ्यामुळे मच्छिमार बांधव आर्थिक संकटात सापडलेला आहे. तलावातील मृत मासोळ्या पाण्यात तरंगत असून दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तलावातील मासे कशामुळे मृत पावले, याचे कारण अद्यापही कळले नसले तरी मच्छिमार बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच परिसरात माशांच्या मृत्यूमुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वेळीच नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
गटनेते विलास विखार यांनी केली तलावाची पाहणी
सदर तलावात हजारो मासोळ्यांचा मृत्यू झाला असल्याने नगर परिषदेचे गटनेते विलास विखार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सदर तलावाचे लवकरात लवकर शुद्धीकरण करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच सदर प्रश्न सुटेल, असा विश्वास विलास विखार यांनी व्यक्त केला आहे.