सिंदेवाही : तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. लोनवाही वॉर्डमध्ये उभे असलेल्या एका उमेदवाराला मतदार यादीत चक्क दोन बायका दाखविण्यात आल्याने याद्यांचा घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मतदार याद्या सदोष असल्याने नावे शोधताना मतदारांची दमछाक होत आहे. तालुक्यातील शहराला लागून असलेली लोनवाही ग्रामपंचायत आहे. निवडणुकीकरिता चार वॉर्डातून उमेदवार उभे असून, मतदार याद्यांतील मतदारांचा शोध घेणे सुरू आहे. विवाहित झालेले, बाहेरगावी असलेले मतदार, मृत पावलेल्या उमेदवारांची नावांचा यादीत शोध घेणे सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांची नावे एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात गेली आहेत. हे सर्व शोधत असताना एका उमेदवाराला चक्क दोन बायका दाखविण्यात आल्या आहेत. आडनाव सारखे लिहिले आहे. मतदार यादीत क्रमांक, फोटो वेगळा असून श्वेता व विद्या या नावाने बायकांची नाव आणि वय फरक असल्याची नोंद मतदार यादीत आहे. अशा घोळामुळे आता उमेदवारांचीही दमछाक होत आहे.