राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : ३९० वर्षांच्या इतिहासाची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे. भाविकांसाठी चिमूरची घोडा रथ यात्रा श्रद्धेसह आकर्षण ठरत आहे . ही यात्रा सलग पंधरा दिवस चालते, हे विशेष.जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजी पंत चोरघडे यांच्या विनंतीवरून ई.स.१७५० मध्ये चिमूर येथे २00 एकर जमीन मंदीर उभारणीसाठी दिली. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभामंडपात १२ खांब असून त्यावर हत्ती, वाघ, अशा प्राण्यांचे चित्रे कोरल्या गेली आहेत. त्यापुढे चार दगडी खांब असलेला एक सभामंडप आहे. त्याला वर आधारशिला बसविलेल्या आहेत. श्रीहरी बालाजींची मूर्ती काहिशी तिरुपती बालाजींच्या मूर्तीसारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरूड खांब असून बाहेर काही पूजारी मंडळीच्या समाध्या बांधलेल्या आहेत.श्रीहरी बालाजी मंदिरात दरवर्षी मिती माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. माघ दयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोडा रथावरून श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला रात घोडा असे संबोधण्यात येते. या रात घोड्याला पंचक्रोशीतील लाखो भाविक हजेरी लावून बालाजी महाराजांचे दर्शन घेतात.सामाजिक संघटनांकडून सुविधाया यात्रेदरम्यान अनेक सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांकडून भाविकांसाठी अनेक सुविधा पुरविल्या जातात. यात्रेकरिता नगर परिषदेकडूनही भाविकांना अनेक सुविधा पुरविल्या जातात. पंधरा दिवस चालणाऱ्या या घोडा रथ यात्रेमुळे चिमुरात भक्तीचे वातावरण असते.अशी आहे आख्यायिकाई.स. १७०४ मध्ये चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावराच्या गोठयासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. यामध्ये एका ठिकाणी कुदळ मारताच धातुसारखा आवाज आला. तेव्हा भिकू पाटील यांनी खोदकाम थांबविले. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले व स्वप्नानुसार आणखी त्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली. तेव्हा खोदकामामधून एक सुंदर मूर्ती वर आली, अशी या मंदिराबाबत आख्यायिका ऐकायला मिळते.
भाविकांचे आकर्षण ठरतेय घोडा रथ यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:19 IST
३९० वर्षांच्या इतिहासाची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते.
भाविकांचे आकर्षण ठरतेय घोडा रथ यात्रा
ठळक मुद्देचिमुरात भक्तीचे वातावरण : चिमूरच्या घोडा रथ यात्रेला ३९० वर्षांची परंपरा