ब्रह्मपुरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनद्वारे ग्राम शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय, सडक - अर्जुनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०१९ - २०मध्ये सहाव्या सत्रात सर्व विभागातून गुणानुक्रमे सर्वप्रथम आलेले यंत्र अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी कृष्णा जगदीश वंजारी (९९.३०%) यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गुणवंत विद्यार्थी कृष्णा वंजारी यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर आपण कसे घडलो. याबरोबरच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ब्रह्मपुरी संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देतात, असे सांगितले. विभागप्रमुख प्रा. दुलारी गाढवे यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करून कसे ध्येय गाठले, याकरिता कृष्णाचे कौतुक केले. संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. अनिल पावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण रोजगारक्षम बनवण्यासाठी कसे हितावह आहे, याचे विवेचन केले. ग्रामशिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार हेडाऊ यांचादेखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी आणि आपले ध्येय गाठावे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता दहावीचे ४५ विद्यार्थी, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच दोन्ही संस्थांचे माजी विद्यार्थी मनोज कापगते, दुर्योधन बनकर, राहुल मुनीश्वर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रशांत खानोरकर यांनी केले. प्रा. नितीन पोटे यांनी आभार मानले.