चंद्रपूर : होळी व रंगपंचमी सण पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य गांधी चौक, गिरनार चौक यासह अन्य परिसरांतही मोठ्या प्रमाणात दुकाने सजली आहेत. मात्र, कोरोनाचा आलेख वाढतीवरच असल्याने खरेदीसाठी ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत आहे. त्यामुळे यंदाचीही होळी मागील वर्षीसारखी रंगहीन होणार तर नाही ना, अशी भीती रंग, पिचकाऱ्या व गाठी विकणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना सतावत आहे.
होळी हा सण रंगात न्हाऊन निघण्याचा सण आहे. एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. तर, बच्चेकंपनीही पिचकारीच्या साहाय्याने रंग उडवून धमाल करीत असतात. त्यामुळे दरवर्षीच चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजतात. मात्र, मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने होळी सण पाहिजे त्या उत्साहात साजरा करता आला नाही. मध्यंतरी, रुग्ण कमी झाल्याने सर्व पूर्वपदावर येत होते. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग, गुलाल, गाठी असे रंगपंचमीला लागणारे साहित्य बोलवले. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. त्यामुळे होळीसाठी बोलवलेला माल अंगावर तर बसणार नाही ना, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.
बॉक्स
छोटा भीम, मोटू-पतलूची पिचकारी
लहान मुले मोठ्या प्रमाणात कार्टून पाहतात. त्यांना छोटा भीम, मोटू-पतलू, नोबिता यांनी अक्षरक्ष: वेड लावले आहे. त्यामुळे स्कूलबॅगपासून नोटबुकपर्यंत ते छोटा भीम किंवा मोटू-पतलूचे चित्र असलेल्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळे छोटा भीम, मोटू-पतलू, नोबिता यांचे चित्र असलेल्या पिचकाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ही पिचकारी ४० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. त्यासोबतच लहान-मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग उपलब्ध आहेत. एक रुपयाच्या रंगाच्या पुडीपासून तर छोटे-मोठे रंगाचे डबे, स्प्रे कलर उपलब्ध आहेत. ३० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत स्प्रे कलर बाजारात उपलब्ध आहेत.
बॉक्स
आरोग्याची काळजी घ्या
रंगपंचमीला ‘बुरा न मानो, होली है’, असे म्हणत मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण करण्यात येते. सद्य:स्थितीत बाजारपेठेत विविध रंगांचे फुगे, तर अत्यंत भडक रंग बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या रंगांत रासायनिक पदार्थांचे मिश्रण केले असल्याने ते आरोग्यास अपायकारक ठरते. तर, ग्रामीण भागात बंडीचे वंगण, अंडे, नाल्यातील पाणी टाकून रंगपंचमी खेळण्यात येते. मात्र त्यामुळे चर्मरोग, त्वचारोग व आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन रंगपंचमी खेळावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
बॉक्स
गाठीच्या किमतीत वाढ
होळी सणानिमित्त बालकाला, लग्न जुळलेल्या वर-वधूंना गाठी देण्याची प्रथा आहे. मागील वर्षी या गाठीची किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंत होती. मात्र, यंदा गाठी १०० ते १२० रुपये किलोपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. परंतु, ग्राहकांची मागणी कमी प्रमाणात दिसून येत आहे.