शालिकराव ढोरे मृत्यू प्रकरण : शालिनीताईंची विनंती केली मान्य ब्रह्मपुरी : माझ्या पतीचा अपघात नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत माझ्या पतीच्या मारेकरांना अटक करा, अशी विनंती शालीनीताई ढोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती. ती विनंती मान्य करीत आरोपींवर गुन्हा दाखल करावे आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडे प्रकरण सोपविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली (कालेता) येथील रहिवासी शालिकराम ढोरे यांचा ३० आॅगस्ट २०१६ रोजी अपघाती मृत झाल्याचे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविले होते. मात्र मृतकाची पत्नी शालिनीताई ढोरे यांनी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू नसून खून झाला असल्याने आरोपीचा शोध घेऊन गुन्हेगाराला अटक करण्यात करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी काही साक्षीदारांचे बयाण हत्येच्या बाजूने नोंदविले होते. ठोस पुरावा नसल्याचे कारण सांगून हे प्रकरण तेथेच गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मृतकाच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सत्य दडपून राहता कामा नये म्हणून त्यांनी चौकशी अहवालाची प्रत माहितीच्या अधिकारात मागितली. त्याआधारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. दीपक शुल्का यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करीत न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि इंदिरा जैन यांनी १३ फेब्रुवारी रोजी निकाल दिला की, या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांनी योग्य निर्णय न घेता गुन्ह्याची नोंद बरोबर नाही. त्यामुळे मृत्यूच्या नोंदीमध्ये हत्या झाल्याची नोंद घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हे प्रकरण सोपविण्याचे आदेश दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक
By admin | Updated: February 20, 2017 00:25 IST