चंद्रपूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकालाच १ फेब्रुवारीपर्यंत हेल्मेट अनिवार्य करण्यात आला आहे. विना हेल्मेट कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी घेतला आहे.
मागील वर्षी झालेल्या अपघातात मृतकांच्या संख्येत विना हेल्मेट परिधान करून असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच वाहतूक कार्यालयातर्फे याबाबत विविध उपक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या हस्ते हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना दुचाकीने कार्यालयात येताना १ फेब्रुवारीपासून हेल्मेट अनिवार्य करण्यात आला. विना हेल्मेट परवानगी देण्यात येणार नाही, अशा सूचनाही यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिल्या आहेत.