चंद्रपूर: गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने चंद्रपूर शहरातील सखल भागात असलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांना चांगलाच फटका बसला. यात व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी झाली की, आझाद बाग परिसरातील रस्ते जलमय होतात. यंदाही तेच घडले. पावसाचे पाणी तळमजल्यातील दुकानांसह अन्य दुकानांमध्ये शिरल्याने दुकानातील साहित्य पावसाने भिजले. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी मोठी कसरत करून दुकानातील पाणी बाहेर काढले. आझाद बाग परिसरातील मोहित मोबाईल शॉपीमध्ये पाणी शिरल्याने जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आझाद बागेलगतच्या दुतर्फा असलेली कापड दुकाने, जोडे-चप्पल विक्रीची दुकाने, स्टेशनरी दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तळमजल्यातील दुकानातील मालही पाण्याखाली आला. यामुळे व्यापाऱ्यांनी नुकसानीचा दावा केला आहे. मुसळधार पावसानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी साचले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आला. तो गाळ आणि वाहून आलेली रेती अद्यापही रस्त्यावर पडून आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. (प्रतिनिधी)
मुसळधार पावसाचा व्यापाऱ्यांना फटका
By admin | Updated: June 21, 2015 01:57 IST