फोटो २ आहेत.
भद्रावती : तालुक्यातील वायगाव येथे गुरुवारी दुपारी १२.३० वाजता तब्बल अर्धा तास बोराएवढ्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला. अशा प्रकारच्या गारांचा पाऊस गावकऱ्यांनी प्रथमच अनुभवला.
गारांचा आकार इतका मोठा होता की, बराच वेळपर्यंत गारा विरघळल्या नव्हत्या.
गारांच्या तडाख्यात येथील पोईनकर यांच्या मालकीच्या पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, तसेच घसाई व उकड्याचे काम चालू असलेल्या हळद पिकाचे गारांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी झाडापासून गव्हाचे दाणे वेगळे झाल्याचे संबंधितांनी सांगितले. यासोबतच हरभरा पिकाचे नुकसान झाले. आंबा पिकावरही गारांचा परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात आंबे जमिनीवर पडल्याचे विकास पोईनकर यांनी सांगितले.
तालुक्यातील गोरजा या गावामध्येसुद्धा वादळी पाऊस झाला. या पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जगन दानव यांनी सांगितले.