गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या पाचही आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. या पाचही आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळणे फार कठीण झाले आहे. पाचही आरोग्य केंद्रातील जवळपास सर्वच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. परंतु या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वर्चस्वदेखील राहिलेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. हे कर्मचारी कधीच शासकीय वेळेत या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचत नाहीत. त्यामुळे या आरोग्य केंद्रामधून रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. इतकी वाईट परिस्थिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून बसल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. गांगलवाडी येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असताना एक पद मात्र एक वर्षांपासून रिक्त आहे, तर एक पद तात्पुरते भरले आहे. त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारीदेखील बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. त्यामुळे येथे गंभीर समस्या निर्माण झाल्यास रुग्णाला या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. या आरोग्य केंद्रात दोन वर्षांपासून औषधी निर्माता पद रिक्त आहे. हे पद अत्यंत आवश्यक असताना शासनाने अजुनपर्यंत ते भरलेले नाही. त्यामुळेदेखील या आरोग्य केंद्रात समस्या निर्माण झाली आहे. तसेच महिला सुपरवायझर पददेखील रिक्त आहे. इतर अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही येथे कॉलरा या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे गांगलवाडी येथील आरोग्य केंद्र केवळ शोभेची वास्तू बनली आहे. वरिष्ठ अधिकारी ब्रह्मपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यूची लागण झाली. या आजाराममुळे तीन व्यक्तींना जीव आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही आरोग्य सेवेत कोणतही सुधारणा झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील जाग आली नाही व शासनालाही जाग आली नाही. ब्रह्मपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आरोग्य केंद्रातील सेवा ढेपाळली आहे. (वार्ताहर
ब्रह्मपुरी तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली
By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST