ब्रह्मपुरी : तालुक्यातील बरडकिन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी शिजविण्याच्या वादावरुन गावातील काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. नामदेव कोंडूजी बगमारे असे मुख्याध्यापकाचे नाव असून ही घटना गुरूवारी दुपारी घडली.शासना निर्णयानुसार मुख्याध्यापकाने शाळेतील मुलांना खिचडी शिजविण्याचे काम गावातील काही नागरिकांना दिले. परंतु बरड किन्हीतील दिलीप महाडोरे, सुधाकर मुळे, निलीमा दोनाडकर, रेखा ढोक, अनुराधा मुळे, गंगाधर राऊत, धनश्री ढोक यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक विचारणा केली. तेव्हा मुख्याध्यापकाने शासन निर्णयानुसार आपण संबंधित नागरिकांना खिचडी शिजविण्याचे कार्य दिले, असे सांगितले. मात्र सर्व ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी वाद घातला. वाद वाढत गेल्याने अश्लील शिविगाळ झाली. यातूनच गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला मारहाण केली. यात मुख्याध्यापकाच्या उजव्या खांद्यास दुखापत झाली असून या प्रकरणाची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी दिलीप महाडोरे, सुधाकर मुळे, निलीमा दोनाडकर, रेखा ढोक, अनुराधा मुळे, गंगाधर राऊत, धनश्री ढोक आदींवर भादवि १४३, १४७, १४८, १८६, ३५३, ३२३ व भादंवि १०४, ४२३ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास एपीआय पराते करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
खिचडी शिजविण्यावरून मुख्याध्यापकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 02:00 IST