चंद्रपूर: सांसद आदर्श गाव चंदनखेडा येथील विकास कामांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज घेतला. सर्व विभागाने निर्धारित वेळेत विकास कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत ना.अहीर यांनी पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम, पशुसंवर्धन विकास, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पाणी पुरवठा योजना, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंचन विहीरी, शेततळे, वृक्ष लागवड, ठक्करबापा योजना, घनचकरा व्यवस्थापन, शौच्छालय बांधकाम, स्वयंमरोजगार व खादीग्रामोद्योग इत्यादी विभागाचा त्यांनी आढावा घेतला.या बैठकीपूर्वी ना.अहीर यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावा घेतला. बँकांनी केंद्राच्या योजना प्राधान्याने राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री मुद्रा योजना यशस्वी करण्याची जबाबदारी बँकाची असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांची मार्गदर्शक तत्वे पुढील बैठकीत ठेवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. बँकांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कर्ज देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहीत करावे असे ते म्हणाले.यावेळी विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
हंसराज अहीर यांनी घेतला सांसद आदर्श गावाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 01:23 IST