भद्रावती : तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय (क.स्तर) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जूनला न्यायालयाचे बार रूममध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.शिबीराचे उद्घाटन न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश एन.ए. इंगळे यांचे अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती ए.यू. कुंठे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. अरुण तामगडे, अॅड. प्रशिष ताठे व भद्रावती पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी संदीप गोडशेलवार तर अतिथी म्हणून भद्रावती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अॅड. सुधीर भालेराव, सचिन अॅड.मिलिंद रायपुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.वन्यप्राणी संरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन अॅड. अरुण तामगडे यांनी केले. त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाची माहिती देत वन्य प्राण्यांवर होत असलेल्या अत्याचारावर अनेक कायदे तयार झाले असून वन्य प्राण्यांचे संरक्षण वा जतन कसे करता येईल, त्यांच्या संरक्षणाविषयीची काळजी व त्यांना तयार झालेल्या कायद्यांची माहिती त्यांनी दिली. अॅड. प्रशिष ताठे यांनी बाल संरक्षण कायद्याची माहिती दिली. ग्राम विस्तार अधिकारी गोडशेलवार यांनी पंचायत समिती शेष फंड, जिल्हा परिषद शेष फंडातून राबविण्यात येणाऱ्या कृषी, महिल व बाल कल्याण, ग्रामसभा, शिक्षण व अन्य विभागातील विविध योजनांची माहिती दिली. या शिबीरात १०० हून अधिक पक्षकार, अधिवक्ता व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार अॅड. सूर्तीकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
भद्रावती येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराची सांगता
By admin | Updated: June 22, 2016 01:19 IST