नीलेश झाडे
गोंडपिपरी :
मिरची तोडायला गेलेले हजारो मजूर तेलंगणात अडकले होते. गावांनी झिडकारले. शेत मालकांनी वाऱ्यावर सोडले. मिळेल त्या झाडाच्या आसऱ्याने मजुरांनी दिवस काढले. प्रत्येक दिवस हृदयावर खोल जखमा देत होता. कसेबसे ते स्वगावी पोहचले. तेलंगणाचा रस्ता बघणार नाही अशा शपथा अनेकांनी घेतल्या. मात्र स्वगावी हाताला काम नाही. कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न गंभीर. शेवटी मागील वर्षी सोसलेल्या यातनांची उजळणी करीत पोट भरण्यासाठी हजारो मजुरांचा जत्था सीमा ओलांडत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील हजारो मजूर मिरची तोडायला तेलंगणा गाठतात. चांगली मजुरी मिळत असल्याने मिरची तोडायचा कामाला मजुरांची पसंती आहे. मात्र
मागील वर्षी कोरोनाचे संकट देशावर कोसळले. देश ताळेबंद झाला. हजारो मजूर तेलंगणात अडकून पडले. कोरोनाच्या भीतीत माणुसकी थिटी पडली. मजुरांना गावात स्थान दिल्या गेले नाही. महारोग्यासारखी वागणूक त्यांना मिळाली. गावाबाहेर मिळेल त्या झाडांच्या आसऱ्याने मजुरांनी दिवस काढले. उपाशीपोटी मजुरांनी शेकडोचे अंतर कापले होते. शासनाने पुढाकार घेतला अन् मजूर स्वगावी पोहचले. आता तेलंगणाचा रस्ता बघणार नाही असे अनेक मजूर बोलत होते. मात्र गावात रोजगार नाही. हात रिकामे. कुटुंबाचा भार कसा पेलायचा या विवंचनेत असलेल्या मजुरांनी शेवटी तेलंगणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. यातनांची उजळणी करीत गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो मजूर तेलंगणा गाठत आहेत.
नियमांची ऐसीतैशी
तेलंगणात मिरची तोडण्यासाठी मजुरांना मिळेल त्या वाहनांनी नेल्या जात आहे. ऑटो, टेम्पोत मजुरांना खचाखच भरले जात आहे. वाहतुकीचे सारेच नियम धाब्यावर बसविले जात आहे. हा प्रवास मजुरांना जीवघेणा ठरणारा आहे.