लेखा परीक्षकाचा आशीर्वाद : पंचायत प्रशासन झोपेतगोंडपिपरी : मागील सत्रात गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत वेडगाव ग्रामपंचायतीला राजीव गांधी सेवा केंद्राच्या बांधकामासाठी आठ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. यासाठी साडेसात लाख रुपयांचा निधी खात्यातून काढण्यात आला. आता या खात्यात केवळ पन्नास हजारांची रोकड शिल्लक असताना केवळ ३० टक्के काम करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हाच प्रकार तेथील अंगणवाडी बांधकामासंदर्भात देखील घडला. या दोन्ही कामाचा डोलारा अद्यापही उभा होण्याची चिन्हे नाहीत. या गंभीर स्थितीत पंचायत विभाग कुंभकर्णी झोपेत आहे तर खुद्द लेखापरीक्षकांचा आशिर्वाद ग्रामसेवकावर असल्याने लाखोचा निधी हडपणारा हा ग्रामसेवक अजूनही मोकाटच आहे.वेडगाव ग्रामपंचायतीला राजीव गांधी सेवा केंद्रासाठी १० लाख रुपयांचा निधी मागील वर्षी मंजूर झाला. त्यापैकी आठ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला मिळाला. ग्रामपंचायतीने आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के बांधकाम केले असून उर्वरित काम अद्यापही बाकी आहे. धाबा येथील ग्रामीण बँक शाखेतील खात्यातून तत्कालिन सरपंच मडावी व ग्रामसेवक राजकुमार दुर्गे यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. आता त्यांच्या खात्यात केवळ ५० हजार रुपये आहेत. सचिव व सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने या रकमेचा व्यवहार झाला. मात्र खर्चाच्या मानाने कामाची प्रगती अगदी नगण्य असल्याने यात मोठा घोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. अंगणवाडी बांधकामातही असाच प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गुजरी येथे हे बांधकाम प्रस्तावित होते. अंदाजपत्रकानुसार साडेतीन लाख रुपये खर्च करून त्यावेळेस सदर काम पुर्ण करणे अपेक्षित होते. या कामासाठी १ लाख ८० हजार रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यानुसार बांधकामाला सुरुवात होणे गरजेचे असताना अजूनपर्यंत अंगणवाडीच्या कामाला सुरुवात झाली नाही. मात्र तरीही शासनाकडून मिळालेली बांधकामासाठीची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यातून काढण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. आता ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे लेखा परीक्षण सुरू आहे. वेडगाव ग्रामपंचायतीत लेखा परीक्षक येऊनही गेले. त्यांनी वरील दोन कामाचे लेखापरीक्षण न करता इतर कामाचे परिक्षण केले. यावेळी या दोन कामाचे लेखापरीक्षण न होण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता सदर कामाचा रेकॉर्डच ग्रामपंचायत कार्यालयातून गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा गंभीर प्रकार लेखा परीक्षकाच्या नजरेत भरूनही त्यांनी ग्रामसेवकाविरूद्ध अजुनपर्यंत कार्यवाहीचे कुठलेच पाऊल उचलले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एव्हाना लेखापरिक्षकाने या प्रकारातून ग्रामसेवकाच्या बचावासाठी त्यांना बरीच मुदत दिली असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
लाखोंचा निधी हडपणारा ग्रामसेवक मोकाटच
By admin | Updated: April 24, 2016 01:05 IST