गेवरा : सावली तालुक्यातील डोंगरगाव (म्हस्के) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रार्थना व ध्यान करण्यास विद्यमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोप माजी अध्यक्ष महादेव करकाडे यांनी पत्रकारपरिषदेत केला.एकीकडे शासन-प्रशासनाने राष्ट्रसंताचे विचार सतत तेवत राहावे म्हणून देशभरात गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने सामुदायिक प्रार्थना व ध्यान करण्यात येते. डोंगरगाव (म्हस्के) येथे २००६ साली अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये येथील ४५ सदस्य गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य करीत आहेत. येथील ध्यान व प्रार्थनेसाठी स्वत:ची इमारत नसल्याने गावातील हनुमान मंदिरात ध्यान व प्रार्थना केली जात आहे. मंडळाच्या काही सदस्यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालिन आमदार अतुल देशकर यांनी इमारतीसाठी निधी दिला. त्यातून ग्रामपंचायत परिसरात सामाजिक भवन तयार करण्यात आले. त्या इमारतीमध्ये प्रार्थना व ध्यान केल्या जात होते.नवीन इमारतीत विद्युत पुरवठा नसल्याने ध्यान व प्रार्थना काळात विद्युत पुरवठा ग्रामपंचायतीमधून केला जात होता. सदर काम सुरळीत सुरू असताना विद्यमान ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेवून विद्युत पुरवठा बंद केला व ध्यान, प्रार्थना करण्यास अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने गुरूदेव भक्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सभागृहातील राष्ट्रसंताची प्रतिमा हटविण्याबाबतही दोन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंताचे विचार घराघरात पोहचविणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यावर गदा आणण्याचा प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.राष्ट्रसंताचा अवमान करणाऱ्या डोंगरगाव (म्हस्के) येथील ग्रामपंचायत प्रशासनावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी अध्यक्ष महादेव करकाडे, धर्मराव करोडकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
गुरुदेवभक्तांना प्रार्थना व ध्यान करण्यास ग्रामपंचायतीकडून मज्जाव
By admin | Updated: November 3, 2015 00:29 IST