नागभीड : नागभीड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २२ जून रोजी होत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका आल्याने या गावातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.वासाळा मेंढा, किटाळी मेंढा, येनोली (माल) आणि सोनापूर या गावात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची तारीख ४ जून ते ७ जून आहे. भरलेल्या अर्जाची छानणी ९ जून तर अर्ज मागे घेणे आणि चिन्हांचे वाटप ११ जूनला होणार आहे. मतदान २२ जून तर मत मोजणी २३ जून रोजी होणार आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तालुका स्तरावरील राजकीय नेत्यांनी आपल्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना या निवडणुकासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्याची माहिती असून निवडणुकीत कोणतीही कसर ठेवू नका, असा कानमंत्र दिल्याचे वृत्त आहे. लवकरच येणारी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक महत्त्वाची केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागभीड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे
By admin | Updated: May 29, 2014 23:57 IST