सर्वत्र कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णवाढीवर आहे. चंद्रपुरात मात्र कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हे रिॲलिटी चेक करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी अधिष्ठाता या नात्याने डाॅ. अरुण हुमणे यांची आहे. मात्र, त्यांचा कुठेही वचक जाणवला नाही. रुग्णालयातील शकडो सफाई कर्मचारी गेल्या ४० दिवसांपासून डेरा आंदोलन करत आहे. यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचाही बोजवारा आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही अवस्था असताना याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचेही यावेळी निदर्शनास आले. या रुग्णालयातील अनेक विभागांना वालीच नाही. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवितो. ही अवस्था येथे प्रकर्षाने जाणवली. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत सुविधा निर्माण करून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलीकडच्या काळात विविध आजारांतही वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह विदर्भातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. दररोज दीड ते दोन हजारांच्या जवळपास ओपीडीचे रुग्ण रुग्णालयात येत असून येथे तज्ज्ञ डॉक्टर बोटावर मोजण्याइतके आहेत. येथे लावलेल्या बोर्डनुसार ओपीडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. रुग्ण अधिक असले तर ओपीडी एखादी तास अधिक चालविण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश आहेत. परंतु, येथील ओपीडीतील डॉक्टर आठ वाजता येण्याऐवजी उशिरा येतात. तसेच १२ वाजेपूर्वी जात असल्याचे चित्र आहे. बुधवारी लोकमत चमूने ११.३० वाजेच्या दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली असता, ओपीडीतील कक्ष क्रमाक ११, १२, १३ तसेच कक्ष क्रमांक १४ इसीजी कक्षात एकही डॉक्टर आढळून आले नाही. रुग्ण बराच वेळ डॉक्टर येतील म्हणून प्रतीक्षा करीत होते. परंतु, डॉक्टर आलेच नाहीत. रुग्णसेविकेने कक्षाला कुलूप लावताच चिठ्ठी काढून ओपीडीमध्ये तपासणीसाठी आलेले रुग्ण परत गेले.
बॉक्स
अनेक पदे रिक्त
वैद्यकीय महाविद्यालयात जर्नरल मेडिसीन, सर्जरी, अस्थिरोग विभाग, कान, नाक, घसा, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, दंतरोग, नेत्ररोग, आयुष यासह इतरही काही विभाग आहेत. ओपीडीत येणारे रुग्ण या विभागाशी निगडित असतात. मात्र, रुग्णांच्या तुलनेत येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पदे कमी आहेत. त्यातही अनेक पदे रिक्त आहेत. तर बहुतांश डॉक्टर उशिरा येतात आणि लवकर परत जात असल्याने रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
बॉक्स
रुग्णालयातील भिंती रंगलेल्या
वैद्यकीय महाविद्यालयातील भिंती मोठ्या प्रमाणात खर्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबत असणारे नातेवाईकही खर्रा खाऊन रुग्णालयात वावरत असतात. तसेच भिंतीवर थुंकतात. मात्र, याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
बॉक्स
औषधसाठ्यांची कमतरता
वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, येथील औषधालयात अनेक प्रकारच्या औषधीसाठ्याची कमतरता दिसून येते. अनेकदा रुग्णांना चक्क बाहेरुन औषधी खरेदी करण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसत आहे.
कोट
ओपीडीची वेळ सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत असते. रुग्ण जास्त असल्यास एखाद्यावेळेस एखादी तास अधिक ओपीडी चालते. जे डॉक्टर ओपीडीत उशिरा येतात आणि लवकर जातात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांची काही पदे रिक्त आहेत. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. अरुण हुमणे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर