मूल : नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर वार्ड क्र. ८ मधील सर्व्हे नंबर ९०, ९२, ९३ जागेवर ३५० लोकांनी १३ वर्षापूर्वी अतिक्रमण केले होते. अतिक्रमित जागेचे मालकी हक्क व पट्टे मिळावेत, यासाठी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला यश आले असून नगर परिषदने नुकताच ठराव घेऊन चार लाख ६४ हजार रूपये भरण्यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला आहे.
सदर रक्कम तालुका भूमी अभिलेख कार्यालयात भरण्याची प्रक्रिया लवकरच होणार असून अतिक्रमितांना जागेचा मालकी हक्क व पट्टे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अतिक्रमण केलेल्या जागेचा मालकी हक्क व पट्टे मिळावेत यासाठी गेल्या १३ वर्षापासून ३५० लोकांनी शासन दरबारी मागणी लावून धरली होती.नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या श्रमिकनगर वाॅर्ड नं.८ मधील रहिवासी असलेल्या ३५० लोकांनी तहसीलदार,उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सतत मागणी लावून धरल्याने शासनानेही झुकते माप देत अतिक्रमितांना मालकी हक्क व स्थायी पट्टे देण्याविषयी सकारात्मक झाल्याने मार्ग सुकर झाला.या संदर्भात नगर परिषद मूल यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूल यांचे २९ मार्च २०२० यांच्या पत्रानुसार ठराव घेऊन मौजे मूल येथील सर्व्हे न.७१,९०,९२,९३ व मौजे विहीरगाव येथील सर्व्हे न.२३० च्या जागेची मोजणी करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार गेल्या १३ वर्षाचा संघर्ष कामी आला असून नगर परिषद मूलचे पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले. मूल येथील श्रमिकनगर वाॅर्ड नं.८ मधील ३५० लोकांना मालकी हक्क व स्थायी पट्टे मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने नागरिकांचा आनंद दिसून येत आहे.