पीक बुडूनही मदत नाही : शेतकऱ्यांना कडधान्यही घेता आले नाहीचंद्रपूर: खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले. परिणामी मामा तलावाखाली अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धानाचे उभे पीक कुजून सडल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे कडधान्याचे पीकही या शेतीत घेता येत नाही. असे असले तरी या शेतकऱ्यांना अद्याप काहीच मदत मिळाली नाही. याबाबत गोसेखुर्द विभाग व उपविभाग महसूलला निवेदन देऊनही हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.सावंगी दीक्षित व उसरपारचक येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकी हक्क सर्वे नं. ६३. ८०, ८४, ६०, ५९, ४१, ६६, ६१, ५७/३, ५७/२, ८१, ५४, ८२, ८३ ही शेती मामा तलावाला लागून आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकण्यासाठी प्रथम मार्ग काढण्यात आला. या ठिकाणी पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करुन नेते मोकळे झाले. परंतु या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत साधी विचारपूसही केली नाही. या शेतात धान रोवणी केली होती, सततच्या पाण्याने धानाचे शेत तुडूंब भरुन उभे पीक कुजले. वर्षभराचे आर्थिक उत्पन्न या शेतातून मिळत होते. परंतु पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याबाबत तक्रारीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले. परंतु नंतर काहीच झाले नाही. शेतकरी कार्यालयाचा चकरा मारुन थकले. मात्र, या शेतकऱ्यांना छदामही मिळाली नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्दचे पाणी ठरले शेतकऱ्यांसाठी मारक
By admin | Updated: January 16, 2016 01:04 IST