नीलेश झाडे
गोंडपिपरी : नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रथमच झाडीबोली भाषेतील कविता सादर होणार आहे.
गोंडपिपरी येथील कवी अरुण झगडकर लिखित ‘झाडीचा महिमा’ ही कविता संमेलनात वाचली जाणार आहे. कवितेची निवड झाल्याचे कविकट्टा संपर्क समितीच्या संयोजिका अलका कुलकर्णी यांनी झगडकर यांना कळविले आहे. या निमित्ताने नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाडीबोली भाषेचा महिमा दिसणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात देश-विदेशातून २७५० कविता आल्या. त्यातील विभागानुसार विभागणी करून ४८६ कवितांची निवड करण्यात आली आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या पूर्व विदर्भात झाडी बोलीभाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. याची दखल साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने घेतली आहे. झाडी बोली भाषेतील ‘झाडीचा महिमा’ या कवितेची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाडीबोली भाषेतील सादर होणारी ही पहिलीच कविता असल्याचे झगडकर यांनी सांगितले.
कोट
महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर गोंडपिपरी तालुका वसलेला आहे. या भागात अस्सल झाडीबोली बोलली जाते. येथील सर्वसामान्यांचा भाषेत असलेल्या कवितेची निवड अखिल भारतीय संमेलनात होणे, हे माझ्यासाठी आणि माझ्या जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
- अरुण झगडकर, कवी, गोंडपिपरी.