जिल्हा परिषदेत विरोधकांचा राडा : परिस्थिती हाताबाहेर, पोलिसांना पाचारणचंद्रपूर : शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी बैलबंडी घोटळ्याच्या चौकशीसाठी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत गोंधळ घातला. काही सदस्यांनी ग्लास फोडले, माईक तोडले तर काहींनी प्रोसेडींग फाडले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून सभा घेण्याची पाळी सभाध्यक्षांवर आली. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. सभेत विविध विषय चर्चेला ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून गाजत असलेल्या बैलबंडी वाटप घोळाची चौकशी अद्यापही होत नसल्याच्या मुद्यावरून विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. काँग्रेसचे गटनेते सतीश वारजूकर म्हणाले, जिल्हा परिषदेला ५० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र यापैकी पाच कोटींचाही खर्च झाला नाही. जिल्हा परिषदेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहत असून सत्ताधाऱ्यांचे कारभार मृत पावल्याचे म्हणत शोक सभा घेण्याचे म्हटले. मात्र सत्ताधारी निधी खर्च झाल्याचे सांगत होते. त्यामुळे वातावरण आणखी गरम झाल्याने वारजूकर यांनी ग्लास फोडून कारभाराविरूद्ध राग व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सीएसआर फंड अंतर्गत आरोग्यावर केला जाणार खर्च अखर्चित असल्याच्या मुद्यावरही विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर राग व्यक्त करीत गटनेते सतीश वारजूकर यांनी ग्लास फोडले, संदिप करपे यांनी माईक तोडले, चित्रा डांगे बशी फोडली तर नागराज गेडाम यांनी प्रोसेडिंग फाडले. हे प्रकरण चिरघळत असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र तोवर वाद संपुष्टात आला होता. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) विरोधकांचा सभात्याग, भोंगळेंची मध्यस्थीबैलबंडी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. याबाबत कृषी अधिकारी रणदिवे यांना माहिती मागितली असता, ते पोट दुखण्याचे कारण सांगत सभागृहाबाहेर गेले व परत आलेच नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. या विषयावर सुमारे चार तास चर्चा झाली. मात्र सत्ताधारी विरोधकांचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकत सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी करत आठ दिवसात बैलबंडी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विरोधकांना दिले. त्यामुळे पुन्हा सभेला सुरूवात झाली.
ग्लास फोडले, माईक तोडला
By admin | Updated: February 13, 2016 00:34 IST