सावली : येथील घनकचरा व्यवस्थापनातील घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, अन्यथा १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सावली नगरपंचायतमध्ये कंत्राटदरामार्फत शहरात सुमारे २५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना असतानाही या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कचरा संकलित करुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडले. मात्र या कर्मचाऱ्यांचे नोव्हेबर २०२० ते जानेवारी २०२१ या तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. पूर्वीच तटपुंजे वेतन त्यातही तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी अनेकदा थकीत वेतन देण्याची मागणी कंत्राटदार, नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे थकीत वेतन त्वरित द्यावे अन्यथा १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना घनकचरा व्यवस्थापनातंर्गत काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.