आयुधनिर्माणी : महाराष्ट्र पुरोगामी प्राथ. शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने पंचायत समिती येथील गटसाधन केंद्राकडे जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले होते. याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आल्याने बीआरसीकडे जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे.पंचायत समिती भद्रावती कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्राचे (बीआरसी) कार्यालय आहे. या कार्यालयाकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय धोकादायक झाला होता. त्या कारणाने अनेकदा कर्मचारी तथा शिक्षकांना जीव मुठीत घेवून या मार्गाने खाली उतरावे लागत होते. यामुळे याठिकाणी अनेकवेळा पाय घसरून किरकोळ आणि मोठे अपघात झाले आहेत. पंचायत समिती भद्रावती अंतर्गत शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना नेहमी याच मार्गाने जाणे-येणे करावे लागत आहे. असे असताना सुद्धा या ठिकाणचा मार्ग तसाच असुरक्षित ठेवण्यात आला होता. ही गंभीर बाब लक्षात घेवून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीचे अध्यक्ष जगदीश ठाकरे यांनी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना २६ आॅक्टोबरला संघटनेच्या वतीने सदर मार्ग सुरक्षितरीत्या जाता येईल असा करावा, अशा आशयाचे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल घेवून प्रशासनाने या मार्गावर सिमेंट पायऱ्या तयार केल्या आहेत. यामुळे बीआरसीकडे जाण्या-येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. प्रशासनाने निवेदनाची दखल केलेल्या कार्यवाहीस पंचायत समिती भद्रावती येथील सभापती, उपसभापती, सर्व पदाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले आहे. (प्रतिनिधी)
गटसाधन केंद्राकडे जाण्याचा मार्ग झाला सुकर
By admin | Updated: December 3, 2015 01:22 IST