चंद्रपूर : जिल्हयात १ एप्रिलपासून दारुबंदी लागू झाली. स्वप्न पूर्ण झाले. लढ्याला यश आले म्हणून एवढ्यावरच थांबू नका तर जिल्हा व्यसनमुक्त करण्याचे हे शिवधनुष्य सामुहिकपणे उचलण्यासाठी सारेजण सज्ज व्हा, असे आवाहन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मारई पाटण ते महाकाली मंदिर या दारुबंदी अभियानाचा समारोप महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून पार पडला. या निमीत्त दारुबंदी चळवळीच्या वतीने ना.सुधीर मुनगंटीवार यांचा डॉ.राणी बंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दारुबंदी केल्याबद्दल महिलांकडून आभार व्यक्त करणारे सह्यांचे पुस्तक देवून या समारंभातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार वामनराव चटप, डॉ.राणी बंग, अॅड.पारोमिता गोस्वामी, प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देतांना पालकमंत्री म्हणाले, दारुबंदीसाठी महिलांनी मोठा लढा दिला, म्हणूनच यश आले. या पूर्ण यशासाठी दारूबंदीसंदर्भातील अनेक कायदयात बदल करणे आवश्यक आहे. या समारंभादरम्यान ना. हंसराज अहीर, माजी आमदार वामनराव चटप, डॉ.राणी बंग, अॅड. पारोमिता गोस्वामी व जयश्री कापसेयांचे भाषणे झालीत. या कार्यक्रमास दारुबंदी चळवळीच्या असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
व्यसनमुक्तीचे शिवधनुष्य उचलायला सज्ज व्हा
By admin | Updated: May 2, 2015 01:06 IST