कान्हळगाव (कोरपना) : केंद्र शासनाच्या वतीने गॅस अनुदान योजना बंद क रून पुन्हा चालू करण्यात आली. परंतु, सबसिडीपोटी जमा केलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होत नसल्याने अनेक ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे अनुदान योजना अनेक लाभार्थ्यांसाठी भुलभुलैयाच ठरत असल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत गॅस सिलिंडरची ७८३ रुपये किंमत आहे. यातून ३२२ रुपये ही रक्कम अनुदानापोटी लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होते. परंतु, ही अग्रीम रक्कम अद्यापही अनेकांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहे. कधी-कधी बुकिंग करुन लिंकीग केलेले गॅसही येत नसल्याने पुन्हा बुकिंग करावी लागत आहे. बँक खात्यात अनुदानाची रक्कम आज जमा होईल, उद्या होईल या आशेपोटी नागरिकांची दररोज बँकात खेटा सुरू आहे. यात ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी परवड होत आहे. वेळ व आर्थिक बाब खर्ची पडत असल्याने पुरती जनता कंटाळली गेली आहे. सबसीडी अनुदानासाठी राष्ट्रीयकृत बँकेचेच खाते असणे अनिवार्य आहे. यामुळे अनेकांनी राष्ट्रीयकृत बँकात खाते सुद्धा उघडले. मात्र बँकेद्वारेही खाते लिंकीग करण्यासाठी विलंब होत असल्याने गोरगरीब जनतेना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अनुदानाची रक्कम त्वरीत जमा करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
गॅस सबसिडी ठरतोयं ‘भूलभुलैया’
By admin | Updated: March 6, 2015 01:15 IST