चंद्रपूर : कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी बंधूंना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, तर अनेक व्यापाऱ्यांचे निधनही झाले. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज आहोत. शासन निर्देशाचे पालन करीत लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी शहरातील समस्त व्यापारी बंधूंना प्रेरित करून, प्रत्येकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी आग्रह धरू. शासनाच्या ‘मी जबाबदार स्वयंशिस्त, संयम व दक्षता’ या घोषवाक्याचे पालन करून शासनाला सहकार्य करू, असा निर्धार गडचांदूर व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आला.
गडचांदूर येथे व्यापारी असोसिएशनच्या सभेत हा निर्धार करण्यात आला. सभेला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री, सचिव विवेक पत्तीवार, गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, सचिव प्रशांत गौरशेट्टीवार, उपाध्यक्ष धनंजय छाजेड उपस्थित होते. सभेत व्यापारी बांधवांना येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. सभेला रवी गेल्डा, मनोज भोजेकर, राजू सचदेव, जावेद मिठाणी, सलीम, चंदू वडस्कर, शिरीष भोगावार, विठ्ठल वैद्य, प्रशांत दरेकर, मारोती चापले, सचिन निले, आदी व्यापारी बंधू उपस्थित होते.