नरेश पुगलिया : २ सप्टेंबरला चंद्रपुरात मोर्चाचंद्रपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे देशातीेल कामगार वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्राच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी २ सप्टेंबरला होणाऱ्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चात कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.येत्या २ सप्टेंबरला कामगार संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी नरेश पुगलिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आवाहन केले. ते म्हणाले, कामगार संघटनाकडून सरकारकडे सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ईएसआय आणि ईपीएफच्या सुविधा तसेच बोनस सिलिंगची मर्यादा वाढविण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली आहे. तरीही सरकारचे धोरण कामगारविरोधीच राहिले आहे. कामगार कायद्यात बदल करून उद्योगपतींच्या सोईचे कायदे तयार करण्याचे काम या सरकारने सुरू केले असून हा अन्याय आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा देशव्यापी मोर्चा असल्याचे ते म्हणाले. सदर मोर्चा स्थानिक गांधी चौकातून सकाळी १० वाजता निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले जाणार आहे. यात सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधासाठी पुढे या
By admin | Updated: August 30, 2015 00:45 IST