तपास पथके रवाना : पाच ते सात जणांचा समावेश असण्याची शक्यतामूल : वाघाची शिकार करुन त्याच्या अवयवाची विक्री करायला आलेल्या दिलीप मडावी या इसमाला पर्यावरण मित्र उमेश झिरे व वनविभागाच्या पथकाने मूलच्या बसस्थानकाजवळ पकडले. त्यात दोन आरोपीची भर पडल्याने वनविभागाच्या तपासात पुन्हा पाच ते सात जणांचा समावेश असल्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. त्यामुळे इतर आरोपींना पकडण्यासाठी बळ मिळाले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भादुर्णी जंगलात दिलीप श्रीहरी मडावी (५०), श्यामप्रसाद रघुनाथ गुरनुले (४०) दोघेही रा. भादुर्णी तर विनायक नामदेव मदीरवार (३०) रा. उश्राळा चक यांनी डुकरासाठी लावलेल्या विद्युत तारांच्या शिकारीत वाघ अडकल्याने घाबरलेल्या या तिघांनी वाघाचे अवयव दात, नखे व मिशा वेगळे करुन जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्धवट जळलेल्या वाघाला गावाजवळील नदीच्या परिसरात पुरण्यात आले. भादुर्णी कक्ष क्र. ४८५ मधील घडलेल्या या शिकार चक्रात तीन आरोपी सोमवारी अडकले. यात तपासणीअंती पुन्हा पाच ते सात जण सहभागी असल्याची माहिती असून तपासासाठी वनविभागाने आरोपींच्या वनकोठडीची मागणी केली. मूलच्या न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत आरोपींना वनकोठडी सुनावली आहे. आरोपीच्या शोधात पथके तयार करण्यात आली असून गडचिरोली, सिंदेवाही मार्गाकडे पथके रवाना झाली आहेत. तपास कार्य चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक विवेक मोरे, चिचपल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी पठाण, मूल बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी ओ. बी. पेंदोर, सहाय्यक वनसंरक्षक पवार आदी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अवयव तस्करी करणाऱ्या आरोपींना वनकोठडी
By admin | Updated: April 7, 2015 23:58 IST