विविध मागण्यांचा समावेश : समन्वय समितीत सहभागचंद्रपूर : आत्महत्याग्रस्त शिक्षक स्व. विजय नकाशे यांना न्याय मिळावा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीसह प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने नागपूर विधानसभेवर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यात राज्यभरातून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.केवळ ३० किलो तांदूळासाठी पीआरसी कमिटीने अमरावती जिल्ह्यातील विजय नकाशे नामक शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. यामुळे नकाशे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला. सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने नवीन पेंशन योजना लागू केली आहे. काम समान असून पेंशनमध्ये फरक कसा, त्यांनाही जुनीच पेंशन योजना लागू करावी या दोन प्रमुख मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यासह आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरीय रोस्टर तयार करण्यात यावे, शिक्षकाकडील सर्व अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी, विषय शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावी, निवडश्रेणी सरसकट लागू करावी, शौचालय स्वच्छतेकरिता शाळेला निधी मिळावा, सर्व शाळांना वीज व पाणी मोफत मिळावे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, जि.प., न.प., म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबलेट पुरविण्यात यावे, डिजीटल क्लाससाठी निधी मिळावा, विद्यार्थी उपस्थितीत भत्ता एक रु. ऐवजी दहा रुपये करण्यात यावा, शालार्थ वेतन प्रणालीचे बिल तालुक्यावर तयार करण्यात यावे, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यात यावा, निमशिक्षकांची सेवागृहित धरून वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणा करावी, वैद्यकीय व जी.पी.एफ. बिल तत्काळ मिळावे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षकांची पदे तातडीने भरावी, विनंती बदलीची अट पाचवरुन तीन वर्षे करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चा चंद्रपूर पुरोगामीचे जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, नारायण कांबळे, दीपक वऱ्हेकर, अल्का ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. (प्रतिनिधी)
पुरोगामी शिक्षक समितीचा नागपूर विधानसभेवर मोर्चा
By admin | Updated: December 27, 2015 01:31 IST