चंद्रपूर : कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे, खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हे अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. यासाठी संबंधितांवर गुन्हाही दाखल होतो. असे असले तरी जिल्ह्यातील काही ठिकाणी अशा पद्धतीने तळलेल्या तेलाचा पुनर्वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईची वाट न बघता वेळीच सावध होऊन अशा ठिकाणचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात. एवढेच नाही तर खाद्यपदार्थ तळताना त्या तेलाचा पुनर्वापर केला जातो. यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिभेचे चोचले पुरविण्यापूर्वी एकदा आपल्या आरोग्याचा विचार करूनच कोणतेही पदार्थ सेवन करण्यापूर्वी विचार केलेला बरा.
बाॅक्स
रस्त्यावर न खाल्लेले बरे
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला उघड्यावर विक्री करणारे पदार्थ आवडीने खातात. मोठ्या हाॅटेलच्या तुलनेमध्ये स्वस्तसुद्धा मिळतात. मात्र, या ठिकाणी कमी दर्जाच्या तेलाचा वापर केला जातो, तसेच तेलाचा पुनर्वापर केला जातो. तेलाचा पुनर्वापर करणे नियमबाह्य आहे. असे पदार्थ सेवन केल्याने पोटाचे, हृदयाचे विकार, घशाची जळजळ आदी वाढण्याची शक्यता असते.
बाॅक्स
तेलाचा पुनर्वापर घातक
तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात.
कोट
तेलाचा पुनर्वापर करून तळलेले पदार्थ सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्राॅल वाढतात. परिणामी आजारांना बळी पडावे लागते. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडीटी तसेच ह्रदयासंबंधित आजार, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ या सारख्या समस्या उदभवू शकतात. कोणतेही पदार्थ सेवन करताना प्रथम चौकशी करून, त्यानंतर खावे. जेणेकरून आरोग्यावर परिणाम पडणार नाही.
-डाॅ. सौरभ राजूरकर
छातीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर.