दरम्यान वीज कंपनीने विशेष लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हाळगाव (सोनुली)च्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन सावरगाव येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ट अभियंता बोंडे यांना देण्यात आले आहे. सावरगाववरून तीन कि.मी. अंतरावर कन्हाळगाव हे आडवळणावर गाव आहे. येथे मागील काही महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. बुधवारीसुद्धा रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. यामुळे गावातील गरोदर महिला, लहान मुले, रुग्ण तथा संपूर्ण गावातील नागरिकांना काळोखाचा, डासांचा, किड्यांचा आणि वातावरणात एकाएकी निर्माण झालेल्या प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. निवेदन सादर करताना शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, शाखा अध्यक्ष चंद्रभान रामटेके, शाखा सचिव सदानंद डेकाटे, ज्येष्ठ कार्यकर्ता वासुदेव खोब्रागडे,हरिदास खोब्रागडे, विलास सोनुले, अशोक बोरकर, गौरीशंकर चावरे, श्रावण कोसरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कन्हाळगाव येथील वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST