ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी(खुर्द) येथील एका तरुणाला भ्रमणध्वनीवर गॅस कंपनीच्या नावाने संदेश पाठवून ‘एजन्सीची डिलरशीप’ देण्याच्या नावाखाली तीन लाख ५३ हजार रुपयांनी फसविले. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील रहिवासी असलेल्या आशिष गिरीधर खरवडे यांच्या भ्रमणध्वनीवर उज्ज्वला गॅस एजन्सीची डिलरशीप या नावाने ८ नोव्हेंबर २०२० ला मॅसेज आला. त्यामध्ये डिलरशीप घेण्यासाठी संकतेतस्थळावर अर्ज करण्याबाबत सांगितले. त्या अनुषंगाने आशिषने संकेतस्थळावर संगणकाद्वारे अर्ज केला. त्यानंतर फिर्यादीच्या ई-मेलवर नोंदणी क्रमांक व पासवर्ड पाठविण्यात आले. नोंदणी शुल्क म्हणून आठ हजार रु. व नाहरकत प्रमाणपत्र शुल्क म्हणून २५ हजार रु. असे एकूण ३३ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर कंपनीकडून टप्प्याटप्प्याने तीन लाख ५३ हजार रु. घेण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून उर्वरित रक्कम चार लाख ८० हजार रु. भरण्यासाठी वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, एजन्सीबाबत आशिषच्या मनात शंका निर्माण झाली. फिर्यादीने इंडियन आईल कंपनीच्या नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता ते संकेतस्थळ खोटे असून, एजन्सी देण्याची तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुगल मॅपद्वारे उज्ज्वला गॅस एजन्सीचा शोध घेतला असता एजन्सीचे कार्यालय अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. याबाबत आशिषने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात संकतेतस्थळ वापरकर्त्यांनी उज्ज्वला गॅस कंपनीचा लोगो वापरून आशिष खरवडेची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.