आवाळपूर येथील प्रकार : रस्ता मोकळा न होताच शासनदरबारी केली चुकीची नाेंद
आवाळपूर : शेतकरी हा दिवस रात्र राबराबून स्वतःचेच नाही तर इतरांचे सुध्दा पोट भरत असतो. एवढेच नाही तर येणाऱ्या अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देत असतो. यात आता शासनाचे अधिकारी सुध्दा भर देत असल्याचे दिसून येत आहे. नांदा-आवाळपूर शेत शिवारातील रस्ता मोकळा केला असे पत्रात दाखवून मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मायाबाई झाबाजी जमदाडे आवाळपूर दुधडेरी यांची नांदा सर्वे क्र १८२ मध्ये १.४१ येथे शेत असून त्यांना शेतात जायला - यायला रस्ता नसल्याने त्यांनी २०१९ मध्ये तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी १५ जुलै २०१९ अन्वये आदेश पारित झाला. त्यानुसार रस्ता मोकळा करुन देण्यात आला होता.
मात्र शेजारच्या शेतकऱ्यांनी मला न विचारता व माझ्या शेतातून सदर रस्ता काढला असल्यामुळे त्यांनी तो ट्रॅक्टरने नांगरून टाकला. त्या ठिकाणी कापसाची लागवड केली. आता दोन्ही शेतकरी शिवधुरा जाण्यायेण्या करिता असला तरी ते रस्ता द्यायला तयार नव्हते.
रस्ता केलेला मोडला अशी पुन्हा तक्रार दि.२ जून २०२० रोजी तहसीलदार यांच्याकडे केली. पत्राचे अनुषंगाने मंडळ अधिकारी व तलाठी हे मौक्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२० ला आलेले होते. दोन्हीं शेतकऱ्यांनी आपण स्व:ताची शेतीची मोजणी करुन ४-४ फूट रस्ता खुला करण्याचे मान्य केले. परंतु त्यांनी शेताची मोजणी न केल्याने परत दि.२८ ऑक्टोबर २०२० ला पत्र काढून येत्या ३० दिवसात शेत मोजून रस्ता मोकळा न केल्यास आदेशानुसार रस्ता मोकळा करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले.
परंतु रस्ता मोकळा झालाच नाही. पुन्हा नायब तहसीलदार यांनी दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मंडळ अधिकारी यांना आपणास एक वर्षाचा कालावधी झाला तरी आपण रस्ता मोकळा करून देत नसल्याने शासकीय कामात हयगय करीत असल्याने येत्या सात दिवसात रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र दिले.
मात्र मंडळ अधिकाऱ्याने कसलाही विचार न करता दिलेल्या दि. २२ फेब्रुवारी २०२१ याच तारखेला चक्क रस्ता मोकळा झाल्याचे दाखवून पत्र दस्तीला लावून ठेवले. प्रत्यक्षात मात्र रस्ता मोकळा झालाच नाही. ही बाब तहसीलदार यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता उघडकीस आली. यावरून अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्येविषयी किती गंभीर आहे हे या प्रकरणा वरून दिसून येत आहेत.
कोट
साहेबांनी रस्ता मोकळा केल्याचे पत्रात दाखविले आहे. याची आम्हाला काही खबरच नाही. उलट रस्ता जैसे थे आहेत. मंडळ अधिकारी यांना निलंबित करून लवकरात-लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातळीने रस्ता मोकळा करून द्यावा.
- झाबाजी जमदाडे, आवाळपूर.
माझ्याकडे या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल बघून पुढील कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण चिडे नायब तहसीलदार कोरपना.