बोरगाव येथील संजय विलास भसारकर तथा इतर २७ जणांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बोरगाव येथील पोस्टमास्टर प्रकाश तुळशीराम भसारकर हे नागरिकांना पोस्टाच्या विविध योजनेबद्दल माहिती देऊन बचत खाते व इतर व्यवहार चालवित होते. प्रकाश भसारकर यांची मुलगी अश्विनी सुबोध मेश्राम ही दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या एचबीएन डायरीज ॲन्ड अल्लीड लिमिटेड या खासगी कंपनीची अधिकृत अभिकर्ता होती. प्रकाश भसारकर यांनी नागरिकांना दाम दुप्पटीचे आमिष दाखवून आपल्या मुलीच्या नावे अभिकर्ता पद असल्याने एसबीएन डायरीज ॲन्ड लिमिटेड या कंपनीत रक्कम गुंतवण्यास नागरिकांना प्रवृत्त केले. रक्कम गुंतवतांना पाच वर्षांच्या मुदतीत रक्कम दुप्पट होईल, असे सांगितले. मुदत संपताच नागरिकांनी रक्कम वसुलीचा तगादा लावला. मात्र टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संबंधित पोस्टमास्तर प्रकाश भसारकर व खासगी कंपनी एजंट अश्विनी मेश्राम यांन्याविरुद्ध फसवणुकीची लेखी तक्रार बोरगाव ग्रामस्थांनी ५ जानेवारी २०२१ रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात केली. दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून, पोलिसांनी कुठली चौकशी न केल्याने अखेर नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना यांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी केली. संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी शुभांगी संजय भसरकर, हरिदास बंडू डोंगरे, प्रियंका कवडू पसारकर, मंगला भुरकुंडे, कुंदा सुधाकर फुलझेले उपस्थित होते.
पाच वर्षांत रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST