गुलदस्त्यात असलेला विषय उघड : स्थानिकांचा मात्र विरोधआक्सापूर : गोंडपिंपरी तालुक्यातील जंगलव्याप्त आदिवासीबहुल कन्हाळगाव येथे हेलिपॅड तयार होत असल्याने कन्हाळगाव वनक्षेत्रात हेलिकॉप्टरद्वारे कोण येणार, याची उत्सुकता नागरिकांना होती. मात्र राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होताच गुलदस्त्यात असलेले कोडे उलगडले. चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव-झरण धाबा-तोहोगाव अभयारण्याच्या प्रस्तावास मंत्रालयस्तरावर मान्यता देण्यासाठी वनमंत्री आणि गावकऱ्यांची बैठक आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा झाला. कन्हाळगाव अभयारण्याच्या निर्मितीला शासनस्तरावर वेग आला असून अचानक कुणालाही कसलाही प्रकारची सूचना अथवा माहिती न देता दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात वनमंत्री यांच्यासह राजुरा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, वाईल्ड अॅड कंझरवेशन ट्रस्ट डब्ल्यू.सी.टी. मुंबईचे अनिस अंधेरिया, आदित्य जोशी, विवेक तुमसरे तसेच मध्य चांदा वनविकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक कर्मचारी आपल्या ताफ्यासह हजर झाले. वनमंत्र्याचे हेलिकॉप्टर दुपारी ३.३० वाजता उतरले आणि ताफा वनविकास महामंडळाच्या विश्रामगृहात दाखल झाला. यावेळी डब्ल्यू.सी.टी. चे प्रमुख अनिस अंधेरिया यांनी अभयारण्य निर्मितीसाठी ज्या बाबी आवश्यक आहेत, त्यात वाघाच्या भ्रमंतीचे क्षेत्र, पाणीसाठा, स्थानिक नागरिकांच्या हिताचे मार्ग, रोजगार निर्मितीचे मार्ग त्यांनी अभ्यास पूर्ण व्याघ्र मार्गाची पाहणी केली.वन दौरे आणि अभ्यास दौरे करण्यासाठी शासनस्तरावरून अभ्यासू लोकांची, वन्यजीवप्रेमींची नियुक्ती करून या भागात पाठविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे भेट दिली. मात्र स्थानिक नागरिकांनी अभयारण्य निर्मितीला विरोध दर्शविला आहे. कन्हाळगाव येथील सरपंच मंगला मडावी, उपसरपंच प्रदीप कुळमेथे व गावकऱ्यांनी झरण-कन्हाळगाव अभयारण्याला अनुमती देऊ नये, असे निवेदन सादर करून प्रत्यक्ष चर्चा केली. मात्र या धावत्या भेटीत वनमंत्र्यानी स्थानिकांना कोणत्याही प्रकारचे समाधान केले नाही. यामुळे अभयारण्याच्या निर्मितीस तीव्र विरोध होणार असुन वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी बोलून दाखविला. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत नागरिक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांत संघर्ष पाहायला मिळणार आहे. (वार्ताहर)
अभयारण्य निर्मितीसाठी वनमंत्री पोहोचले कन्हाळगावात
By admin | Updated: January 19, 2016 00:39 IST