मध्यचांदा विभाग बल्लारशाह येथील प्रकार : उपोषणाचा इशाराकोठारी : मध्यचांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कामाची माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत आॅगस्ट महिन्यात रितसर अर्ज करुन माहिती मागविण्यात आली. मात्र माहिती देण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरुन त्रस्त मोरेश्वर लोहे यांनी विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.२४ आॅगस्टला विविध वनक्षेत्रात झालेल्या कामाची माहिती मिळविण्यासाठी लोहे यांनी अर्ज केला होता. चार महिने लोटून गेले मात्र मागितलेली माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून हेतुपरस्पर टाळाटाळ करण्यात येत आहे. अधिकारी विविध कारणे पुढे करुन भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करीत असतात. वनविकास महामंडळाकडे माहिती मिळविण्यासाठी अनेकांचे अर्ज पडलेले आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केल्या जात नाही. केवळ पत्र देवून माहिती देण्यास टाळाटाळ विलंब केल्या जातो.विभागीय व्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून माहिती पुरविल्यास सांगितले. मात्र अधिकारी विभागीय अधिकाऱ्यांच्या पत्रास केराची टोपली दाखवून मागणी धुडकावून लावतात. असा प्रकार माहिती मागणाऱ्या प्रत्येक अर्जदारासोबत होत असल्याने माहिती मागणाऱ्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसात माहिती प्राप्त झाली नाही किंवा माहिती मागणाऱ्या प्रत्येक अर्जाचा त्वरीत निकाल लावल्या गेला नाही तर विभागीय कार्यालय बल्लारशाह समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कोठारीचे ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर लोहे यांनी दिला आहे. याप्रकरणी विभागीय व्यवस्थापक फारुखी यांनी लोहे यांचा माहितीचा अर्ज २४ आॅगस्टला प्राप्त झाला. त्या अनुषंगाने संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना २८ आॅगस्ट, १० सप्टेंबर, २७ आॅक्टोबरला पत्र पाठवून माहिती पुरविण्यास सांगण्यात आले असून ती प्राप्त न झाल्यास कारवाईचे निर्देश दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)
माहिती अधिकारात माहिती देण्यास वन विभागाची टाळाटाळ
By admin | Updated: December 23, 2015 01:16 IST