नागभीड : दहावी व बाराव्या वर्गात गावातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची नवखळा गावाची परंपरा आहे. यावर्षी या परंपरेचा मान वैभवी गजेंद्र खापरे या गावातून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला मिळाला असून, नवखळा येथील मुख्य चौकातील ध्वजारोहण वैभवीच्या हस्ते होणार आहे.
नवखळा गाव २०१६ मध्ये नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाल्यानंतर या गावाने ही परंपरा सुरू केली. पूर्वी या ठिकाणी गावातील उपसरपंच ध्वजारोहण करायचे. मात्र नगर परिषदेच्या निर्मितीनंतर उपसरपंच हे पद बरखास्त झाल्याने कोणाच्या हस्ते येथील ध्वजारोहण करायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी गावातून दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते २६ गणराज्य दिनाचे, तर १२ वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावर्षी वैभवीने दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण प्राप्त केल्याने तिला हा मान मिळाला. मागील वर्षी वैभवीची बहीण तनयाला हा मान मिळाला होता.