घुग्घूस : येथील एसीसी कंपनीत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाला काठ्यांनी मारहाण करून भंगार चोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना १२ बोर रायफल व जिवंत ताडतुसांसह अटक करण्यात घुग्घूस पोलिसांना यश आले आहे. चिट्टी ऊर्फ भीमय्या सोपर (२६), प्रशांत मालवेणी (२४), कार्तिक कोडापे (२६), विजय तामकाने (२४), सेमत पिंगली (१९) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना नकोडा येथून अटक करण्यात आली.
२० जानेवारी रोजी घुग्घूस येथील एसीसीच्या हद्दीत पाच ते सहा अज्ञात आरोपी भंगार चोरीच्या उद्देशाने घुसले असता कर्तव्यावर असलेला सुरक्षारक्षक श्यामसुंदर प्रजापती यांना लाठीने बेदम मारहाण केली. याच दिवशी घुग्घूस येथून १५ किमी अंतरावरील एसीसीच्या माइन्समध्ये कर्तव्यावर असलेला सुरक्षारक्षक इरफान सिकंदर शाह हे एका सयंत्राजवळ, तर रामकिशन यादव हे अमोनिया स्टोरेज टाॅवरवर कर्तव्य बजावत असताना रात्री बुरखाधारी तीन अज्ञात इसमांनी दोघांनाही बेद्दम मारहाण करून त्यांच्याजवळील बारा बोर रायफल व १२ जिवंत काडतुसे घेऊन फरार झाले होते.
हे घटनास्थळ वणी, जि. यवतमाळमधील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने शिरपूर पोलिसांनी भादंविच्या ३९४, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. घुग्घूस पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दोन्ही घटनांची कबुली दिल्याचे घुग्घूस पोलिसांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत, गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गौरीशंकर, आमटे, सचिन बोरकर, रंजित भुरसे, मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, सचिन डोहे, नितीन मराठे, रवी वाभिटकर यांनी केली. अधिक तपास मंगेश निरंजने करीत आहेत.