पोलीस भरती : ७२ जागांसाठी १५ हजारांवर उमेदवार चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या ७२ जागांसाठी २२ मार्च बुधवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ७२ जागांसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता बोलविण्यात आले होते. त्यापैकी ७३७ उमेदवार हजर राहिले. त्यामधील ८६ उमेदवार हे शारीरिक मोजमापमध्ये अपात्र ठरले. मैदानी चाचणीला एकूण ६५१ उमेदवार सामोरे गेले.पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनात पार पडत असलेल्या भरती प्रक्रियेचे बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत हे असून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व ठाणेदार या भरती प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी राहावी यासाठी पोलीस दलात नातेवाईक असणाऱ्या अधिकाऱ्यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवण्यापासून परीक्षेच्या सर्व प्रक्रियाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे. अपात्र उमेदवारांना काही शंका असल्यास तत्काळ अपिल करण्याची व्यवस्था आहे. (स्थानिक प्रतिनिधी)उमेदवारांच्या नातेवाईक अधिकाऱ्यांना भरती प्रक्रियेतून बाद करणे, शारिरीक, मैदानी आणि लेखी चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे, उमेदवारांचे प्रत्येक परीक्षेसाठी बोटांचे ठसे घेणे यासह भरती प्रक्रियेतील प्रलोभणे, शिफारसी, आमीष आणि भ्रष्टाचारावर कडक निर्बंध आखण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया ही पुर्णत: गुणवत्तेवर आधारीत असून उमेदवारांनी कोणत्या प्रलोभणास बळी पडू नये तसेच असे प्रलोभण कोणी देत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस विभागास द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदिप दिवाणी यांनी केले आहे.
पहिल्या दिवशी ८६ उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र
By admin | Updated: March 23, 2017 00:34 IST