वरोरा : शहरातील मालवयीन वॉर्डात सोमवारी दुपारी आग लागल्याने पाच घरे साहित्यासह जळून खाक झाले. या आगग्रस्त कुटुंबीयांना शासनाची मदत अद्यापही पोहचली नसून शहरातील व वॉर्डातील नागरीक त्यांच्या मदतीकरिता सरसावले आहेत. आगग्रस्त कुटुंबीयांनी पहिली रात्र नजीकच्या साई मंदिरात काढली. या मंदिरात ‘त्या’ कुटुंबीयांकरिता झोपण्याची व्यवस्था वॉर्डवासीयांनी केली.वरोरा शहरातील मालवीय वॉर्डातील उद्धव ताकसांडे, तुकाराम देवकर, संजय कुमरे, प्रविण सिडाम, विशाल सिडाम यांच्या घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. छतावरील टिनही वितळल्याने त्यांना छतही उरले नाही. या पाचही कुटुंबीयासमोर जगण्यासाठी काहीही पर्याय शिल्लक नसल्याचे दिसत असताना, शहर व वॉर्डातील नागरिक त्यांच्या मदतीकरिता धावून आले आहे. नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी यातील काही कुटुंबीयांना राहण्याकरिता स्वत:च्या घरी ठेवून घेतले तर पाचही कुटुंबीयांची दोन्ही वेळच्या जेवन, चहाची व्यवस्था केली. ‘त्या’ कुटुंबीयांचा संसार रुळावर येईपर्यंत त्यांची व्यवस्था करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आमदार बाळू धानोरकर व भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड यांनी आपदग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत केली. या कुटुंबियांना संसाराचे साहित्य व घराचे छत उभारण्यासाठी साहित्य लोकसहभागातून उभारण्याचा मानस मंगल पिंपळशेंडे यांनी व्यक्त केला. महसूल विभागाच्या वतीने जळालेल्या घर व वस्तुंचा पंचनामा केला आहे. परंतु अद्यापही शासकीय मदत मात्र त्या कुटुंबीयांपर्यंत पोहचली नसल्याची माहिती वॉर्डातील नागरिकांनी दिली. आगीची चौकशी केली जात असून आगीचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)
आगग्रस्तांची रात्र साई मंदिरात
By admin | Updated: February 18, 2015 00:43 IST